एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये वाहतूक ठप्प
मुंबई – वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू असलेला संप अद्यापही सुरू आहे. ऐन सणसुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील 250 एसटी आगारांपैकी 63 आगारातील वाहतूक ठप्प होती.
संपाचा सर्वाधिक प्रभाव औरंगाबाद विभागात दिसून आला. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील 47 पैकी 30 आगार बंद होते.
एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद, नागपूर विभागीय प्रदेशात संपाचा जोर असल्याचे सूत्रांनी म्हटले. नागपूर विभाग प्रदेशातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यातील 26 पैकी 17 आगारातील वाहतूक ठप्प आहे. मुंबई विभाग प्रदेशात एसटीची वाहतूक सुरळीत होती. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे या जिल्ह्यातील सर्व 45 आगारातून एसटी वाहतूक सुरळीत सुरू होती.
एसटीच्या पुणे विभाग प्रदेशातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील 55 पैकी फक्त 5 आगारातील वाहतूक बंद होती. तर, 50 आगारातून वाहतूक सुरळीत सुरू होती. नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील 44 आगारांपैकी फक्त 4 आगारातील वाहतूक बंद होती.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कामगार संघटना ठाम असल्याचे चित्र असून सोमवारी न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.