सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:दसरा दिवाळीची भेट,महागाई भत्ता वाढणार
दसरा-दिवाळी या सणांच्या तोंडावर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे तब्बल ११ टक्के महागाई भत्ता वाढणार आहे. १ जुलै २०२१ पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत लवकरच आदेश जारी होणार आहे. कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भक्ता मिळणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनुषंगाने 7 व्या वेतन आयोगाच्या सुधारीत वेतनसंरचना लागू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च 2019 पर्यंत 52 कोटी 74 लाख 57 हजार 600 एवढा खर्च येणार आहे. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा यांचा असा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे. याशिवाय इतर खर्च मिळून 80 कोटी 64 लाख 16 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.