ऑनलाइन वृत्तसेवा

येत्या १२ तासांमध्ये राज्यभर चक्रीवादळाचा धोका:मराठवाड्यात अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती ओढावल्याचीही परिस्थिती आहे. अशात आता या पावसाचा धोका आणखी वाढणार आहे. कारण, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा आता आणखी तीव्र झालेला आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंबंधी ट्विट देखील केलं आहे.


होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या १२ तासांमध्ये राज्यभर चक्रीवादळाचा धोका वाढेल. पावसाची तीव्रता देखील वाढेल. इतकंच नाहीतर २४ तासानंतर हे चक्रीवादळ ओडिसाच्या किनाऱ्यालगत सरकणार आहे.

अधिक माहितीनुसार, चक्रीवादळामुळे राज्यात दमदार पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. हवामानाच्या इशाऱ्यानुसार, राज्यात पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. अतिवृष्टीची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे. खासकरून रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *