राज्य सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे उघडण्याा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे कळकळीचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
राज्यात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, दारुची दुकाने, मॉल्स आदी सुरु करण्यात आल्यानंतर मंदिरे बंदच ठेवल्याने विरोधकांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते. भाजप, मनसे या राजकीय पक्षांबरोबरच अनेक संघटनांनी मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारविरोधात घंटानाद आंदोलने देखील केली. गणेशोत्सवाच्या काळातही मंदिरे सुरू करण्यात आली नव्हती. मात्र टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडली जाणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतरच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने आज राज्यातील सर्व धार्मीयांची प्रार्थना स्थळे सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.