ऑनलाइन वृत्तसेवा

अखेर शाळेची घंटा वाजणार:काय असतील नियम? शिक्षणमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती!

राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यभर मुलांना पुन्हा शाळेत जायला कधी मिळणार? यावर सुरू असलेल्या चर्चेवर पडदा पडला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र, त्यासोबत आता शाळांमध्ये मुलं जाताना नेमके कोणते नियम असतील? हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासंदर्भात आज दुपारी वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, राज्यात ग्रामीण भागात ५वी ते १२वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असणार आहे.

“७ जुलै २०२१ रोजी आपण जीआर काढला होता की ज्या ग्रामीण भागात कोविडमुक्त झाला आहे, तिथे ८ वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती. त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार एसओपीही दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १० ऑगस्ट रोजी त्याच्या एसओपी देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचना दिल्या”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. हा निर्णय निवासी शाळांना लागू असणार नसून, नियमित भरणाऱ्या शाळांसाठीच हा निर्णय लागू असेल, अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, यावेळी वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत शाळांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या काही नियमांचा उल्लेख केला. शिक्षकांचं लसीकरण, शाळांमध्ये हेल्थ ट्रेनिंग, शाळेत येताना घ्यायची काळजी, खेळाबद्दलचे नियम, आजारी विद्यार्थ्यांना शोधायचं कसं, याविषयीचे नियम ठरवण्यात आले असल्याचं त्या म्हणाल्या.

“विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांना अवगत करून देणं आणि त्यांच्याशी कसं वागावं हे शिक्षकांना सांगावं. शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा व्हायला हवी. तसेच, घरात शिरताना मुलांनी काय काळजी घ्यायला हवी, गणवेश धुवायला टाकणे, लागलीच आंघोळ करणे, अशा बाबींचा नियमावलीत समावेश करण्यात आला आहे”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“याशिवाय, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणं, विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी शाळेनं सक्ती न करणं, विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवणं, शक्य असेल तिथे एक दिवसाआड शाळा ठेवणं, या बाबी देखील नियमावलीत आहेत”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीचे दोन डोस व्हायला हवेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेतली जावी, असं देखील नियमावलीत नमूद केल्याचं त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *