12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण पुढच्या महिन्यापासून
देशात कोरोनाच्या तिसऱया लाटेची धास्ती वाटत असतानाच लहान मुलांच्या लसीकरणासंबंधी चांगली बातमी समोर आली आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू केले जाणार आहे.
कॅडिला हेल्थकेअर कंपनी आपली ‘जायकोव्ह-डी’ लस बाजारात आणणार आहे. या लसीचे डोस सुरुवातीला 12 वर्षांपुढील मुलांना दिले जाणार आहेत.
‘जायकोव्ह-डी’ लसीचा आपत्कालीन वापर करण्यास ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कॅडिला हेल्थकेअर कंपनी ऑक्टोबरपासून प्रत्येक महिन्याला एक कोटी डोसचे उत्पादन सुरू करणार आहे. ‘जायकोव्ह-डी’ ही जगातील पहिली डीएनए आधारित कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा तर 56 दिवसांनी तिसरा डोस दिला जाणार आहे. लहान मुलांना सुई न टोचता डोस देण्यात येणार आहे.
मुलांना’जायकोव्ह-डी’पाठोपाठ ‘कोवॅक्सिन’ची लस उपलब्ध होणार आहे. भारत बायोटेक कंपनीने लहान मुलांवर या लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. कंपनी या चाचणीचे निष्कर्ष आणि आकडेवारी असलेला अहवाल पुढील आठवडय़ात ‘डीजीसीआय’कडे सादर करणार आहे. तसेच सिरम इन्स्टिटय़ूट 2 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांवर ‘कोवावॅक्स’च्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणी करीत आहे.