मराठवाड्यात पुन्हा पाऊस:राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिमूसळधार
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार,दोन दिवस मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मनाबाद, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता फार कमी वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या वतीनं जारी केलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच हवामानातील बदलांनुसार येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
औरंगाबाद आणि परिसरातील पावसाचा जोर दोन दिवसांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सातारा, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अमरावीत, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.