शुभ मुहूर्तावर घरी गणपतीची स्थापना करा,पूजेची तयारी आणि विसर्जनाची वेळ जाणून घ्या
भाद्रपद. शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश चतुर्थी ही विविध नावांनी ओळखली जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती मूर्तिची स्थापना आणि प्राण प्रतिष्ठापना करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.
गणेश पुराणात यास विनायकी चतुर्थी असे संबोधले गेलेआहे. गणेश भक्त आणि उपासकांत भाद्रपद चतुर्थी अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या गणेश पूजनाचे, नामस्मरणाचे, आराधनेचे लवकर फळ मिळते, असे सांगितले जाते. या शुभ मुहूर्तावर घरी गणपतीची स्थापना करा, पूजेची तयारी आणि विसर्जनाची वेळ जाणून घ्या
गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची योग्य वेळी स्थापना करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. याकरिता पूजेची शुभ वेळ दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपासूनते रात्री १० पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही १० सप्टेंबरला दुपारी १२.०० नंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करू शकता.
गणेश मूर्तीची स्थापना करण्याकरिता तुम्ही चौरंग किंवा पाट घेऊ शकता. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्यांची डहाळी , सुपाऱ्या घ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या,👍 नारळ, फळे, गणपती बाप्पाला आवडणारे केवड्याचे पान, फुले, हळदी, कुंकू, तांदूळ, अगरबत्ती, निरांजने व प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी व गणपती बाप्पाची स्थापना करावी.
यंदा अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी चतुर्दशी तिथी १९ सप्टेंबर पासून सुरू होईल आणि २० सप्टेंबर पर्यंत चालू राहील. यामध्ये गणेश विसर्जनाचा शुभ काळ आहे.
सकाळी मुहूर्त ७: ३९ ते १२:१४ पर्यंत त्यानंतर दुपारी १:४६ ते ३:१८ पर्यंत, संध्याकाळी ६:२१ ते रात्री १०:४६ पर्यंत मध्यरात्री १:४३ ते ३:११पर्यंत तसेच २० सप्टेंबरला पहाटे ४:४० ते सकाळी ६:०८ पर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे.(साभार-लोकसत्ता)