बीड जिल्ह्यातील 22 गावांचा सम्पर्क तुटला:धरणे ओव्हरफ्लो:पिकांचे अतोनात नुकसान
बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस वाताहत करत आहे. मंगळवारी सकाळपासूनच नॉन स्टॉप पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो, वाहतुकीची पुलं पाण्याखाली, नद्यांना पूर, साठवण तलाव खचाखच भरले आहेत.बिंदुसरा धरणाचे पाणी मोठ्या चादरीवरून वाहत असून बीड शहरातील जुन्या दगडी पुलावरून पाणी वाहत आहे,
खरिप हंगाम धोक्यात आला आहे. बीड जिल्ह्याची वाटचाल ओल्या दुष्काळाच्या दिशेने सुरू आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच नॉन स्टॉप पावसाने सुरूवात केली आहे. सोमवारी रात्रीही अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने बीड जिल्ह्याची दाणादाण उडवून दिली आहे. गेवराई तालुक्यातील गोदाकाठावर असणाऱ्या 45 गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोदाकाठाच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे.
माजलगावचे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पातील पाणीपातळी 50 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच लगु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. साठवण तलाव खचाखच भरले आहे. असंख्य वाहतुकीची पुलं पाण्याखाली आहेत. अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पावसाने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कन्हेरवाडी येथील पुलावरून पाणी असल्याने परळी-अंबाजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कुंडलिका, बिंदुसरा, मणकर्णिका नद्यांना पुन्हा एकदा पूर आला आहे.
खरिप पिकांची वाताहत
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वार्षिक सरासरी ओलांडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे आहे. कापूस, सोयाबीन, बाजरीचे पीक जमिनदोस्त झाले आहेत. जिल्हाभरातील शेतीची अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, पावसाचे पाणी जमिनीत घुसले आहे.
डोंगरपट्ट्यातील 22 गावांचा संपर्क तुटला
रविवार, सोमवार आणि मंगळवार तीन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सखल भागासह डोंगराळ भागातीलही वाताहत झाली आहे. डोंगरपट्ट्यातील तब्बल 22 गावांचा संपर्क तुटला आहे. अतिशय उंचावरून वाहणारा वडवणी-धारूर रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वडवणी आणि धारूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बालाघाट डोंगरावर असणाऱ्या 22 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वडवणी आणि धारूर रस्ता पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला आहे. वडवणी आणि धारूर तालुक्यात खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याला नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वडवणी तालुक्यात मंगळवारी पावसाने धुमाकूळ घातला. तालुक्याच्या विविध भागांमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पिंपरखेड गावांमध्ये पुन्हा एकदा महापूर आला. या महापुराचे पाणी पिंपरखेड गावामध्ये शिरले.
सोमवारी महापुरामुळे दुर्घटना घडून तीन लोकांचा मृत्यू झालेल्या पिंपरखेडामध्ये आणखी पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, साळींबा या गावांमध्येही पाणी शिरले होते. तालुक्याच्या अनेक गावाचा संपर्क या पुरामुळे तुटला होता. वडवणी बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सर्व तालुक्यातील नागरिकांची एकत्रित धावपळ झाली. तालुक्यातील सर्व पिकांचा नायनाट झाला असून शंभर टक्के सोयाबीन, तूर, मूग, कापूस या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
दोन दिवसात अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी जनावरे वाहून गेल्याची तर काही ठिकाणी जीवित हानी झाल्याची घटना घडली आहे
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ
मराठवाड्यातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस आहे. अनेक छोटी मोठी धरणं भरलीयत. नांदेड, परभणी, हिंगोली, बीडमध्ये पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून 4 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालीये.अनेक शिवारात नदीकाठच्या जमिनी आणि पिकं खरडून गेलीत. सलग तीन दिवस परभणी जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे नाले नद्याना पुर आलाय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण शंभर टक्के भरलंय.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं निम्म्या मराठवाड्याची तहान भागवलीय मराठवाड्यातील दुधना, माजलगाव, बिंदुसरा, विष्णुपुरी, सिद्धेश्वर, मनार ही धरणं पूर्ण भरलीयेत. तर इसापूर आणि येलदरी धरण भरण्याच्या मार्गावर आहेत. अनेक लहान मध्यम प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झालेत. लातूरची तहान भागावणा-या मांजरा प्रकल्पात 51 टक्के पाणीसाठा झाल्यानं लातूरकरांची पाण्याची चिंता मिटलीय. जायकवाडी धरण मात्र अजूनही भरण्याच्या प्रतीक्षेत आहे, धरणात 45 टक्के पाणीसाठा आहे.