ब्राह्मणांविरोधात वादग्रस्त वक्तव्य:मुख्यमंत्र्यांच्या वडिलांविरोधात FIR दाखल
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रायपूर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कोणीही कायद्याच्या वर नाही. जरी ते माझे ८६ वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म, प्रत्येक वर्ग, प्रत्येक समुदायाच्या नागरिकांचा आदर करते, असं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री बघेल यांच्या वडिलांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. भूपेश बघेल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या आदेशानंतर त्यांचे वडील नंदकुरमा बघेल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रायपूर पोलिसांनी डीडी नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी कलम ५०५ आणि १५३ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मण समाजाविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर समाजात आक्रोश आहे. नंदकुमार बघेल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. ब्राह्मण समाजाकडूनही आंदोलन केली जात आहेत. नंदकुमार बघेल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जात आहे. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी वडिलांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नंदकुमार बघेल यांनी शनिवारी एका सभेत ब्राह्मण समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं.
सामाजिक कार्यकर्ते असलेले नंदकुमार बघेल हे गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात लखनऊमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ज्याला मत, त्याचे सरकार. ब्राह्मण विदेशी आहेत. ज्या प्रकारे इंग्रज भारतात आले होते, तसेच ब्राह्मणही इथून जातील. ब्राह्मणांनी सुधरावं अन्यथा इथून जाण्यासाठी तयार रहावं. ब्राह्मण विदेशी असल्याने त्यांच्याविरोधात नाराजी आहे. ते आपल्याला अस्पृश्य समजतात. आपले अधिकार हिसकावून घेतात. गावा-गावांमध्ये जावून ब्राह्मणांविरोधात बहिष्कार करू, असं नंदकुमार बघेल म्हणाले होते.(साभार-म टा)