औषधनिर्माण शास्त्रच्या पदविका अभ्यासक्रमसाठी 1680 जागा वाढल्या
मुंबई : औषधांच्या दुकानांमध्ये पदविकाधारकाची नियुक्ती बंधनकारक झाल्यानंतर औषधनिर्माण शास्त्रच्या पदविका अभ्यासक्रमाला आलेली मागणी अजुनही कायम आहे.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता राज्यातील २८ संस्थांना पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
६० विद्यार्थ्यांची प्रत्येकी एक तुकडी याप्रमाणे मान्यता मिळाल्यामुळे पदविकेच्या एकूण जागांमध्ये १,६८०ची भर पडणार आहे.
एकूणच औषधनिर्माण शास्त्र पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगली मागणी आहे. औषधांच्या दुकानांमध्ये पदविकाधारकाची नियुक्ती बंधनकारक केल्यानंतर पदविका अभ्यासक्रमांचा भाव वधारला. यंदा पदवी अभ्यासक्रम चालविणाऱ्या २८ संस्थांना पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास ‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ने मान्यता दिली आहे. औरंगाबादमधील १०, नाशिकमधील ९, पुण्यातील ४, मुंबई ३, नागपूर, अमरावती प्रत्येकी १ याप्रमाणे महाविद्यालयांना जागा वाढविण्यास मान्यता मिळाली आहे.