ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

‘मंदिर उघडू नका असं केंद्र सरकारनं अजिबात सांगितलेलं नाही-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई: मंदिरं उघडण्याच्या भाजपच्या मागणीला उत्तर म्हणून केंद्र सरकारकडं बोट दाखवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ‘मंदिर उघडू नका असं केंद्र सरकारनं अजिबात सांगितलेलं नाही. देशातील सगळ्या राज्यांनी मंदिरं उघडली आहेत. त्यामुळं आपल्या मनासारखं करून केंद्रावर ढकलणं बंद करा,’ असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.


नवी मुंबई इथं फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना धार्मिक स्थळांवरील निर्बंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं. ‘उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सगळ्या राज्यांत मंदिरं खुली आहेत. दारूची दुकानं उघडण्यास सरकार परवानगी देतं, मॉल उघडले जातात. हॉटेल्स उघडली जातात. हे सगळं उघडणं आवश्यक आहे. त्यांना आमचा विरोध नाही. पण तिथं गर्दी होत नाही का? फक्त मंदिरातच गर्दी होते का? राज्य सरकारचा हा तर्क पूर्णपणे चुकीचा आहे. या संदर्भात वस्तुनिष्ठ विचार केला गेला पाहिजे,’ असं फडणवीस म्हणाले.

‘मंदिरं उघडणं हा आमच्यासाठी केवळ आस्थेचा विषय नाही. आम्ही वारंवार सांगितलंय, आम्ही हिंदू आहोत. ३३ कोटी देव आहेत आमचे. अगदी समोरच्या खांबातही (सभागृहातील पिलरकडे लक्ष वेधत) आमचा देव आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न मंदिरांवर मोठ्या संख्येनं अवलंबून असलेल्या गरिबांचा आहे. अगरबत्ती, फुलं विकणारे असे अनेक लोक मंदिरांवर अवलंबून आहेत. त्यांना सरकारनं काय मदत केली? जेवढा विचार दारू पिणाऱ्यांचा आणि विकणाऱ्यांचा करता, त्याच्या ५ टक्के तरी मंदिरांवर अवलंबून असलेल्यांचा करा,’ असं फडणवीस यांनी सरकारला सुनावलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *