वेळेत उपचार न मिळाल्यास होणार वैद्यकीय अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई
सरकारी रुग्णालये आणि आरोग्यकेंद्रात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णावर वेळेत उपचार न झाल्यास किंवा वेगवेगळ्या विभागात फिरण्याची वेळ येऊन मृत्यू झाल्यास रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचा कठोर निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी घेतला.
सरकारी रुग्णालयांमध्ये अनेकदा रुग्णावर वेळेत उपचार होत नसल्याच्या घटना घडतात. मध्यंतरी अशीच एक घटना राज्यातील एका सरकारी रुग्णालयात झाली. छातीत दुखत असल्यामुळे एका शासकीय रुग्णालयातील अपघात विभागात दाखल झालेल्या झालेल्या एका रुग्णावर वेळेवर उपचार झाले नाहीत. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चौकशीतून रुग्णालयातील ढिसाळपणा पुढे आला. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याच्या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. सरकारी रुग्णालयात किंवा आरोग्यकेंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियमातील तरतुदींच्या आधारे वैद्यकीय अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाईही केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.