दिलासादायक बातमी:तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच:तज्ज्ञांचे मत
मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती (Third Wave of Corona)लक्षात घेता, केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य सेवा आणखी बळकट करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. पण तज्ज्ञांचे मत आहे की, आता तिसरी लाट येण्याची शक्यता फारशी नाही. ऑक्टोबरच्या आसपास तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी विध्वंसक आणि प्राणघातक असेल.
केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य सध्या यावर काहीही बोलण्यास तयार नाहीयेत. पण समोर आलेल्या माहितीनुसार, तिसरी लाट येणार नाही आणि जर आली तर त्याचा फारसा धोका नसेल असं सांगण्यात येत आहे.
ऑगस्टच्या अखेरीस करोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण
सेंट्रल करोना टास्क फोर्सचे काही वरिष्ठ सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची नवीन प्रकरणे सतत कमी होत आहेत. ऑगस्टच्या अखेरीस महाराष्ट्र आणि केरळमध्ये करोनाची प्रकरणे खूप वेगाने खाली येतील. आज काही राज्ये वगळता, बहुतेक राज्यांमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. ऑगस्टच्या अखेरीस, भारतात करोनाची प्रकरणे दररोज २० हजारांपेक्षा कमी होतील. दरम्यान, लसीकरण ६५ कोटी लोकांपर्यंत केले गेले असते.