पोष्टमनदादा देणार दोन सुविधा:दोन कंपन्यांसोबत करार
मुंबई – पूर्वी काळापासून पोस्टमनला मल्टीटास्किंग पर्सनॅलिटी समजले जाते. पत्र पोहोचविताना ते वाचून दाखविणे, मनी ऑर्डर पोहोचविताना पैसे मोजून देणे, आनंदाची बातमी असेल तर चेहरा प्रफुल्लित ठेवणे आणि दुःखाची बातमी असेल तर भावनिक आधार देणे या सर्व भूमिकांमधून पोस्टमन जायचे. आजही काही प्रमाणात खेड्यापाड्यांमध्ये तसेच चित्र आहे. आता पोस्टमनवर आणखी एक जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ती म्हणजे लोकांच्या गाड्यांचा विमा उतरविण्याचे.
पोस्टमनने आता तुम्हाला गाडीचा विमा उतरविण्याचा सल्ला दिला, तर त्याचे आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आता त्यांच्याकडे दुचाकी आणि चारचाकीचा विमा उतरविण्याचे कामही देण्यात आले आहे.
त्यासाठी डाक विभागाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक लोकांमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहे.
आता पोस्टमन तुम्हाला मनी ऑर्डरच्या माध्यमातून रोख रक्कम पोहोचवितानाच घर बसल्या विम्याची सुविधाही देतील. हल्ली धावपळीच्या युगात लोकांना सरकारी किंवा खासगी कंपन्यांच्या खेटा घालून विमा उतरविण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेधाकरांना डाक विभागाने दिलासा दिला आहे. त्यासाठी डाकघरातच विम्याची सुविधा प्रदान करायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आता लोक डाकघरातच आपली दुचाकी, चारचाकी किंवा इतर जनरल इंश्यूरन्स करू शकरणार आहेत.
डाक विभागाने टाटा आणि बजाज कंपनी सोबत करार केला आहे. दोन्ही कंपन्या खातेधारकांना वेळेच्या आत क्लेमही देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या योजनेमुळे डाक विभागाच्या उत्पन्नात तर वाढ होणार आहेच, पण लोकांचीही इतर ठिकाणी खेटा घालण्यापासून मुक्ती होणार आहे. खातेधारकांचा विमा काढण्यासाठी पोस्टमनला स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. पोस्टमन याच फोनद्वारे विमा काढत आहेत. योजना सुरू झाल्यावर हरिद्वारमध्ये दोन लोकांनी आपल्या वाहनांचा विमाही काढून घेतला आहे.