कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस महत्वाचा: सायरस पुनावाला यांचं आवाहन
करोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर सहा महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं अभ्यासामध्ये दिसून आलं आहे. त्यामुळेच तिसरा डोस घेण्याची गरज असल्याची माहिती पूनावाला यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिलीय. सहा महिन्यानंतर कोव्हिशिल्ड लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं निरिक्षण समोर आलं आहे. यावर पूनावाला यांनी कोव्हिशिल्डच्या बुस्टर डोसचा पर्यायही सुचवला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोव्हिशिल्डच्या प्रभावासंदर्भात बोलताना पूनावाला यांनी मी स्वत: तिसरा डोस घेतला असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर कंपनीतील सात-आठ हजार कामगारांनाही आपण तिसरा डोस दिल्याचं पूनावाला यांनी स्पष्ट केलं. “सहा महिन्यांनी लसीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. लस दिल्यानंतरचा मेमरी सेल कायम शरीरामध्ये राहतो मात्र लसीचा प्रभाव कमी होतो. मी स्वत: तिसरा डोस घेतलाय. सिरममध्ये जे सात-आठ हजार कामगार आहेत त्यांनाही आम्ही तिसरा डोस दिलाय,” असं पूनावाला म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहनही केलंय. “ज्यांना कोव्हिशिल्डची लस घेऊन सहा महिने झालेत त्यांना माझी विनंती आहे की तिसरा डोस त्यांनी घ्यायलाच पाहिजे,” असं मत पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.
करोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. देवाचा कोप होईल या भीतीने काहींनी उपचार नाकारले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पण लक्षणे दिसताच लगेच उपचार घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होईल. मला लोकांच्या दु:खातून पैसे कमवायाचे नाहीत. मी लस विकून पैसे बनवायला बसलेलो नाही. मात्र लोकांनी लस घ्यावी, असंही ते म्हणालेत.