मोठी घोषणा; पुणे निर्बंधात मोठी शिथिलता:हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा
पुणे: पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पालकमंत्री पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील करोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, दोन्ही लशी घेणाऱ्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
हा निर्णय घेण्यात येत असला तरी पुण्याचा पॉझिटीव्हीटीचा दर जर ७ टक्क्यांहून अधिक झाला, तर ही मुभा पुन्हा बद करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुणेकरांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे. सर्व नियम पाळलेच पाहिजे. दुकानांचे मालक आणि सेल्समन हे बऱ्याचदा मास्क वापरत नाही ही तक्रार आहे. मात्र नियमांमध्ये शिथिलता हवी असेल तर खबरदारी घेतली पाहिजे ही मी नम्र विनंती करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
ग्रामिण भागात १३ तालुक्यांमध्ये लेवल ३ ची नियमावली सोमवारपासून लागू करण्यात आली आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराप्रमाणे ग्रामीणलाही सूट द्या अशी मागणई होती. मात्र पॉझटीव्हीटीता दर सरासरी ५ असल्याने तसा निर्णय घेता येत नसल्याचे ते म्हणाले.