कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 101 पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत
नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशापरिस्थितीत सामान्य नागरिकांसह पत्रकार, डॉक्टर, पोलिस अशा कोरोना योद्ध्यांचे देखील कोरोनामुळे प्राण गेले आहे. मात्र केंद्र सरकारने कोरोना महामारीमुळे जीव गमावलेल्या एकूण 101 पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यासाठी 5.5 कोटी रुपये मंजूर केले असून ही माहिती सरकारने राज्यसभेत दिली.
कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रेस माहिती कार्यालयाकडून प्राप्त अर्जांच्या आधारे अशा पत्रकारांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक पत्रकाराच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले जाणार आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेच्या उच्च सभागृहाला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.
दरम्यान, 15 जुलैपर्यंत 21 हजार 837 कोटी रुपयांचे 17.94 लाख आरोग्य विमा दावे निकाली काढण्यात आले असल्याचे वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले.
ते पुढे असेही म्हणाले की, महामारीच्या रोगाचा उद्रेक झाल्यापासून, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने आरोग्य विमा दाव्यांच्या जलदगतीने मदतीसाठी अनेक पावले उचलली होती.