बीडमधील मराठा क्रांती भवन पुढच्या पिढीच्या स्वप्नाला आकार देईल-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागरांचा विश्वास
बीड, दि.१ (प्रतिनिधी)- मराठा समाज नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला आहे. या समाजाच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. मात्र खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. बीडमध्ये उभारण्यात येणारे मराठा क्रांती भवन पुढच्या असंख्य पिढीच्या स्वप्नाला आकार देणारे ठरेल, विद्येची आणि विज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वास्तूच्या माध्यमातून केले जाईल असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
बीडमध्ये उभारण्यात येणा-या मराठा क्रांती भवनासाठी बीड नगर पालिकेने अत्यंत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करू दिली. आज या जागेचे हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,माजी आ बदामराव पंडित,नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर,डॉ अनिल बारकुल,जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, डॉ योगेश क्षीरसागर, बाळासाहेब देशमुख, दिलीप गोरे,मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे,आदि व्यासपीठावर उपस्थित होते
यावेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले कि, सत्ता हे अंतिम ध्येय नसते, ते साधन आहे आणि या साधनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवले पाहिजे तरच त्या सत्तेचा समाजाला उपयोग होत असतो. ऑगस्ट महिना क्रांती महिना म्हणून ओळखला जातो, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती, ९ ऑगस्टचा क्रांतीदिन आणि स्वातंत्र्य दिन हे एकाच महिन्यामध्ये असतात. या ऑगस्ट महिन्यात बीडमध्ये मराठा समाजाच्या होतकरू मुलांसाठी त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मराठा क्रांती भवन उभारले जात आहे आणि त्या चांगल्या कामासाठी आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत हे आमचे भाग्य समजतो. मराठा समाजाच्या पुढील पिढीला भवितव्य घडवण्यासाठी ज्या वास्तुची गरज होती, ती वास्तू आज मुहुर्तमेढ रोवत आहे. या भवनामध्ये इ लायब्ररीपासून वस्तीगृहापर्यंतचे ग्रामीण भागातून आलेल्या मराठा समाजाच्या विद्याथ्र्यांचे प्रश्न सुटावेत हीच आमची भावना आहे आणि त्यासाठी पुढे चालूनही आम्ही प्रयत्न करू, संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामापर्यंत आपल्याला संस्काराची शिदोरी मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची गुढी उभारून एक आदर्श राष्ट्र निर्माण केले आहे. आठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेवून स्वराज्याने महाराष्ट्रच काय देशाचा भूगोल बदलला आहे. राज्य समर्थपणे कसे चालवायचे हे शिवरायांनी दाखवून दिले आहे. आपण आठरा पगड जाती गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहोत, एकमेकांसाठी मदतीचा हात देणे हाच आमचा धर्म आहे असे म्हणत भविष्यात मराठा समाजाच्या या भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून नक्कीच तेथे मोठी वास्तू उभी केली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तत्पूर्वी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,ते म्हणाले मराठा समाजाच्या मागणीची आज मला पूर्तता करण्यात आली याचा मनस्वी आनंद होत आहे मुलींसाठी वसतिगृह आणि गरजूंना या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत ही बेड करांसाठी आनंदाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना असंख्य मावळे बरोबर घेऊन अनेक डावपेच ओळखत त्यांनी प्रत्येक शत्रूवर शक्ती नव्हे तर युक्ती ने विजय मिळवला या सर्व कार्यांमध्ये मराठा समाजाचे मोठे योगदान आहे आज समाजातील गरजूंना मुला-मुलींना भविष्यात लागणार या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी कुठलाही संकोच न करता हा भूखंड उपलब्ध करून दिला आहे याठिकाणी संरक्षण भिंत आणि रस्त्याची मागणी करण्यात आली आहे ती देखील आपण पूर्ण करू,विकास करत असताना कुठलाही भेदभाव न ठेवता केला तर त्याची ओळख कायम राहते,आम्ही नेहमीच सर्व समाज घटकांचा विचार करतो,राजकारणासाठी कुठल्या समाजाचा उपयोग करायचा आणि नंतर त्या समाजाला विसरून जायचे असे आम्ही केलेले नाही,नुसत्या घोषणा देऊन समाजप्रेम करण्यापेक्षा काहीतरी करून दाखवले तरच तो समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो,
यावेळी परळीचे माजी नगराध्यक्ष देशमुख, नगरसेवक सुभाष सपकाळ आदींची भाषणे झाली.छत्रपती सकल मराठा विकास संस्थेचे अध्यक्ष किशोर पिंगळे, सुभाष सपकाळ, डॉ.राजेश भुसारी, डॉ.अनिल बारकुल, गोरख शिंदे, हेमंत औटी, अनिल घुमरे, सत्येंद्र पाटील, राजू पिंगळे, गणेश खरात, नितीन सपकाळ यांनी कार्यक्रम यशस्वी केला.प्रास्ताविक नगरसेवक किशोर पिंगळे यांनी तर उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले,यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते