मराठवाड्यात फक्त बीड जिल्ह्यात निर्बन्ध कायम:२५ जिल्ह्यांतील निर्बंध उठणार!
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध लवकरच उठवण्यात येण्याची शक्यता आहे. कारण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
करोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर राज्यात लागू असलेले निर्बंध उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
२५ जिल्ह्यांतील निर्बंध उठणार!
‘महाराष्ट्रातील २५ जिल्हे ज्यांचा रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा झाली आहे. लेव्हल ३ चे जे निर्बंध होते, त्यामध्ये शनिवार आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र आता फक्त रविवारी दुकाने बंद ठेवून शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकांनाना परवानगी दिली जावी, याबाबत सकारात्मक चर्चा झाली,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोणत्या ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम राहणार?
करोनाचा प्रादुर्भाव अजूनही जास्त असणाऱ्या ११ जिल्ह्यांना लेव्हल ३ मध्येच ठेवण्यात येईल. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच कोकणातील चार जिल्हे आणि मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहतील. हे जिल्हे वगळून राज्यातील इतर २५ जिल्ह्यांमधील निर्बंध लवकरच उठवले जातील, असं राजेश टोपे यांनी सागंतिलं आहे.