देशनवी दिल्ली

वाहन विक्री केल्यास किंवा फास्ट टॅग तुटल्यास काय करणार:महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कारमध्ये फास्टॅग लावणे बंधनकारक झाले आहे. किंबहुना आता फास्टॅग हे रस्ता कर भरण्याचे एक साधन बनले आहे. कारमध्ये फास्टॅग न लावल्यास आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. आता एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे बहुतेक लोकांनी आपल्या गाडीवर फास्टॅग लावला आहे.

परंतु तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे फार आवश्यक आहे. ते म्हणजे, फास्टॅग रिचार्ज कसे करावे आणि ते कसे कार्य करते ? तुम्ही कधी विचार केला आहे की जर आपण आपली कार विक्री केली तर या फास्टॅगचे काय होईल? तसेच जर काही कारणास्तव कारची पुढील काच तुटली तर फास्टॅगचे काय होईल?

आपण आपली कार विकल्यास, आपल्याला आपला फास्टॅग बदलावा लागेल, कारण फास्टॅग आपल्या बँक खात्याशी संलग्न असेल. अशा परिस्थितीत आपल्याला आपला फास्टॅग बंद करावा लागेल. एक गोष्ट लक्षात असू द्या की आपला फास्टॅग हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर केला जात नाही.

तथापि, सध्या काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्याय दिला जात आहे. ज्या माध्यमातून वाहन हस्तांतरणासह फास्टॅगदेखील हस्तांतरीत होत आहे. या प्रक्रियेमुळे आपला फास्टॅग दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याशी जोडणे शक्य होत आहे.

आपला फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक किंवा वॉलेट कंपनीशी संपर्क साधावा लागेल. आपण ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर्सवर कॉल करून आपण सहजपणे फास्टॅग बंद करू शकतो. आवश्यक असल्यास आपला नवीन टॅग बनवून घेता येईल.

याशिवाय पेटीएममध्ये फास्टॅग हस्तांतरीत करण्याचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. त्याआधारे आपण आपला फास्टॅग इतर कोणत्याही फोन नंबरवर हस्तांतरीत करू शकतो. त्यानंतर फास्टॅग दुसऱ्या नंबरशी संलग्न केला जाईल. आपण पेटीएमच्या अ‍ॅपवरून हे कार्य करू शकतो. फास्टॅग बंद करण्यासाठी आपल्याला ग्राहक सेवा केंद्राशी बोलून घेणे आवश्यक आहे.

जर तुमच्या कारची काच फुटली किंवा टॅग तुटला तर तुम्ही नवीन फास्टॅग मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल किंवा जेथे फास्टॅग उपलब्ध असेल तेथे तुम्हाला जावे लागेल. तेथे जाऊन तुम्ही नवीन फास्टॅग घेऊ शकता. फास्टॅगकडून हा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या गाडीची काच फुटली वा या ना त्या कारणामुळे फास्टॅग तुटला तर अशा परिस्थितीत आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *