शिक्षकांसाठी दिलासा:शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास मान्यता
राज्यातील शाळांमधील शिक्षकांची पदे भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी घेतली जाणार आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी गट आणि दुसरा इयत्ता सहावी ते आठवी गट अशा दोन गटांसाठी ही परीक्षा असणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जात असून नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्यातील सरकारी, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये सरकारकडून 6 हजार 100 अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. 2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे तर 2020 मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शक्य झाले नव्हते. मात्र यंदा शिक्षण विभागाने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा झाली असली तरी गेल्या 5 वर्षात अनेकांनी ही परीक्षा दिलेली असून त्यांच्या नियुक्त्या अद्याप झाल्या नसल्याचा तक्रारी येत आहेत,आधी त्यांना प्राधान्य देऊन मगच या परीक्षा घेण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे