घरगुती वीज वापरासाठी येणार प्री पेंड आणि पोस्ट पेंड स्मार्ट मीटर
घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मोबाइलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्री पेड मीटर मध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलातील त्रुटी दूर होतील. अचूक बिल येईल. मीटरमध्ये फेरफार करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच विजेचा काटकसरीने वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल. स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल. याचा फायदा म्हणजे ग्रीडचे व्यवस्थापन स्मार्ट पद्धतीने करता येईल. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच दूरस्थ पद्धतीने मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेता येईल.