दहा लाखांपर्यंतची कामे निविदेशिवाय करण्याची मुभा:दरपत्रकाच्या आधारे करता येतील कामे
मुंबई : करोनामुळे राज्यातील बहुतांश महापालिकांची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असतानाच आता १० लाखांपर्यंतची विविध कामे विनानिविदा करण्याची मुभा नगरविकास विभागाने महापालिकांना गुरुवारी दिली.
शासनाचे विविध विभाग, महापालिका, जिल्हा परिषदा तसेच सार्वजनिक महामंडळामध्ये विविध प्रकारच्या साधनसामुग्रीच्या खरेदीत किं वा विकासकामांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक खर्चाची कामे किंवा खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियाच राबविण्याचा निर्णय सर्वांना बंधनकारक करण्यात आला होता.
मात्र सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलताना सरकारच्या विविध विभागांसह राज्यातील महामंडळे तसेच जिल्हा परिषद, महापालिकांमध्ये १० लाखांपर्यंतची कामे दरपत्रकाच्या माध्यमातून करण्याची मुभा देणारा निर्णय मे महिन्यात घेतला होता.
या निर्णयाची आता महापालिका आणि नगरपालिकांमध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला असून तसा शासन निर्णय निर्गमित के ला आहे. त्यानुसार यापुढे १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदी किंवा कामांसाठी ई-निविदा बंधनकारक करण्यात आली आहे. तर १० लाखांपर्यंतची कामे दरपत्रकाच्या आधारे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दरपत्रके खुल्या बाजारातून कमीत कमी तीन वेगवेगळ्या पुरवठादार / उत्पादकांकडून तुलना करण्यासाठी मागवण्यात यावीत. दरपत्रक सादर करणाऱ्या पुरवठादारांचा खरेदी कार्यालयाबरोबर किं वा अधिकाऱ्यांसोबत कोणताही हितसंबंध नसावा. तसेच मोठ्या रकमेच्या कामांचे तुकडे पाडून कामे करण्याची पद्धत काटेकोरपणे टाळावी, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.