शेतकऱ्यांसाठी बाजार समित्यांमार्फत1लाख कोटी:मोदी सरकारची घोषणा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आणि कोरोना रुग्ण यांच्यासाठी दोन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी बाजार समित्यांमार्फत 1 लाख कोटी रुपये पोहोचवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. यासह कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी केंद्र सरकारनं 23 हजार कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणाही केली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येईल, असा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी या पॅकेजकडं लक्ष द्यावं, असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलं आहे.
सरकार बाजार समित्या मजबूत करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठीच हे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आल्याचं ते म्हणाले. त्याशिवाय यापूर्वी इन्फ्रास्टक्चरसाठी केंद्र सरकारनं 1 लाख कोटींचा निधी जाहीर केला होता. त्याचा उपयोग बाजार समित्यांसाठीही करता येणार असल्याचं तोमर यांनी सांगितलं आहे.
कोरोना लढाईसाठी दुसरं पॅकेज
कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत असताना केंद्र सरकारनं विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 15 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. कोरोना सेंटर्स उभी करणं, हेल्थ सेंटर्स, कोरोना लॅब यांच्या विस्तारासाठी या निधीचा वापर करण्यात आल्याचा दावा सरकारनं केला आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरत असताना भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी अतिरिक्त 23 हजार कोटींच्या निधीची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे.
विस्तारानंतर मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाल्यानंतर गुरुवारच्या बैठकीत या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः शेतकरी आणि कोरोना रुग्ण या दोन घटकांना केंद्रस्थानी ठेऊन सरकार आपली धोरणं आखत असल्याचं यातून सिद्ध झालं आहे. प्रत्यक्षात या निधीचा शेतकऱ्यांना आणि कोरोना रुग्णांना कसा फायदा होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.