सेवानिवृत्तीचे वय 60 आणि अडीच लाख पदे भरण्याच्या मागणीचा 5 जुलैला निर्णय
केंद्रीय कर्मचाऱयांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याच्या प्रमुख मागणीच्या संदर्भात येत्या 5 जुलै रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत सरकारी अधिकारी महासंघाची बैठक होत आहे. या बैठकीत सरकारी कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असल्याने राज्यातील लाखो सरकार कर्मचाऱयांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या अनेक मागण्या काही काळापासून प्रलंबित आहेत. त्यातील सर्वात प्रमुख मागणी निवृत्तीचे वय 60 करण्याची आहे. केंद्रीय कर्मचारी व अन्य काही राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱयांच्या निवृत्तीचे वय साठ आहे.
त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या निवृत्तीचे वय साठ करावे अशी मागणी सातत्याने गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्याशिवाय राज्य सरकारी कर्मचाऱयांची अडीच लाख पदे रिक्त आहेत. ही पदे विनाविलंब भरण्याची मागणी आहे. बक्षी समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी करावी अशीही मागणी आहे.