संपूर्ण राज्यात आजपासून 4 नंतर संचारबंदी तसेच जमावबंदी लागू राहणार:फक्त अत्यावश्यक सेवा चालू
संभाव्य तिसऱया लाटेचा धोका, सात जिह्यांत वाढलेला कोरोनाचा संसर्ग तसेच रत्नागिरी, जळगावसह काही जिह्यांत आढळलेले डेल्टा प्लसचे रुग्ण या पार्श्वभूमीवर सावधगिरीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सर्वच जिह्यांना तिसऱया स्तराचे निर्बंध लागू केले आहेत. यानुसार आज सोमवारपासून राज्यात दुपारी 4 नंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापने बंद राहणार आहेत. त्याबरोबरच संपूर्ण राज्यात संचारबंदी तसेच जमावबंदी लागू राहणार आहे.
राज्यात तिसऱया लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या बदलत्या रूपामुळे डेल्टा आणि आता डेल्टा प्लस या नवीन अधिक घातक विषाणूचा फैलाव होऊ लागला आहे. यामुळे येत्या चार ते सहा आठवडय़ांत राज्याच्या मोठय़ा भागात कोरोनाच्या तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता राज्य सरकारकडून वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई-पुण्यासह अकोला, अमरावती, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, जालना, चंद्रपूर अशा सर्वच जिह्यांत स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.
सोमवारपासून हे निर्बंध
अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील.
मॉल्स, सिनेमागृहे संपूर्ण बंद.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने आणि शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा.
उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवडय़ातील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत.
खासगी कार्यालये कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत.
अत्यावश्यक सेवासंबंधी शासकीय कार्यालये 100 टक्के क्षमतेने.
धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी.
अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
लग्न समारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणे आवश्यक.
कृषीसंबंधित दुकाने, आस्थापना आठवडय़ातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.