ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

मराठवाडा पाणी ग्रीड टप्प्या-टप्प्याने होणार पैठणपासून सुरुवात:ठाकरे सरकारचा निर्णय

मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याचा पाण्याची ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्या-टप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. या संदर्भातील प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील इतर तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत एकूण पाण्याची उपलब्धता व निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांमधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास अहवाल (सुसाध्यता) सादर करण्यात येणार आहे

काय आहे मराठवाडा वॉटर ग्रीड?

कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि उद्योगांच्या पाण्याचं एकत्रित ग्रीड करण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात दमनगंगा-पिंजाळ, तापी-नार-पार आणि कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील 7 टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.


मराठवाडा ग्रीडमध्ये 1 हजार 330 किलोमीटर मुख्य पाईपलाईन असेल. यात 11 धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव, ) लूप पद्धतीने जोडण्यात येतील.
त्यानंतर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी 3 हजार 220 किलोमीटर दुय्यम पाईप (Secondary) लाईन प्रस्तावित आहे.
प्रस्तावित ग्रीडची ठळक वैशिष्ट्ये

लूप पद्धतीमुळे एका ठिकाणाहून पाणी उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या ठिकाणचंही पाणी देता येईल.
दोन्ही दिशांना पाणी वाहून नेण्याची (उलट प्रवाह-Bidirectional) सुविधा असल्यामुळे दोन्ही बाजूंनी एका पाईपलाईनद्वारे पाणी हस्तांतरित केले जाऊ शकते.
एखाद्या साठ्यात अतिरिक्त पाणीसाठा असेल, तर तो पाईपलाईनद्वारे दुसऱ्या ठिकाणच्या धरणात नेला जाईल. उदा. जायकवाडीतील पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडलं जातं. त्याऐवजी ते इतर धरणात सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो.
भविष्यात उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून पाणी देणे प्रस्तावित आहे.
मुख्य पाईपलाईनपासून जलशुद्धिकरणाची प्रक्रिया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी दुय्यम पाईप लाईन प्रस्तावित आहे.
प्रस्तावित दुय्यम पाईपलाईनद्वारे 20 किलोमीटर परीघातील गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना ठोक स्वरुपात दुय्यम पाईप लाईनद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.

योजनेची सद्यस्थिती

मराठवाड्यातील 10 प्राथमिक संकलन अहवालापैकी 8 जिल्ह्यांसाठी 8 प्राथमिक संकलन अहवाल, तसेच मराठवाड्याकडे इतर खोऱ्यातून पाणी आणण्यासाठी 2 प्राथमिक संकलन अहवाल प्रस्तावित आहेत. त्यापैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी 2 पीडीआर मेकोरोटकडून प्राप्त झाले आहेत.

बीड जिल्ह्यासाठी एकूण किंमत 4 हजार 801 कोटी 86 लक्ष आहे, त्यामध्ये एकूण पाईप लाईन 1078.61 कि.मी. आणि 5 जलशुद्धीकरण केंद्राची एकूण क्षमता 255 दशलक्ष लिटर प्रस्तावित आहे.

या कामाचं नियोजन, अंमलबजावणी, परिचालन व देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *