डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा:केंद्राचे आदेश
नवी दिल्ली : डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवावे आणि त्यांच्यावर साथरोग विकार (सुधारणा) कायदा २०२० नुसार कडक कारवाई करावी, असा आदेश केंद्र सरकारने शनिवारी राज्य सरकारांना दिला आहे.
करोना साथरोगाच्या काळात देशातील अनेक भागांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या त्याची दखल घेऊन केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले आहे.
डॉक्टर अथवा आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या अथवा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तर त्यामुळे त्यांच्या नीतिधैर्याचे खच्चीकरण होते आणि त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्याचा आरोग्य यंत्रणेवरही विपरीत परिणाम होतो, असे भल्ला यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवून खटले शीघ्रगती न्यायालयाकडे वर्ग केले पाहिजेत. जेथे आवश्यक असेल तेथे साथरोग विकार (सुधारणा) कायदा २०२० नुसार कारवाई करावी, असा आदेशही देण्यात आला आहे.