बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश
मुंबई : आगामी शैक्षणिक वर्षात थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय अनिवार्य असणार नाहीत. विज्ञान शाखेतील निश्चित केलेले कोणतेही तीन विषय घेऊन बारावी झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतील.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पदविकेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित, भौतिकशास्त्र या विषयांची सक्ती मागे घेतली. त्याऐवजी दिलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी झालेल्या विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरवण्यात आले. परिषदेचा हा निर्णय वादग्रस्त ठरला. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना असल्याचे परिषदेने सांगितले. आता राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी पदविका प्रवेशाबाबत परिषदेच्या निर्णयाची री ओढली आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य असणार नाही. त्याचप्रमाणे पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात आर्थिक मागास प्रवर्गासाठी (ईडब्ल्यूएस) राखीव जागातील रिक्त जागा दुसऱ्या वर्षीदेखील थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी ईडब्ल्यूएससाठी आरक्षित राहाणार आहेत.
प्रथम वर्षासाठी प्रवेश परीक्षा नाही…
पदविकेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा होणार नाही. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकालाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये शिकण्याचा पर्याय यावर्षी राज्यात पहिल्यांदाच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील प्रवेशासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयांसह गणित किंवा जीवशास्त्र यांपैकी एक विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे, अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये बारावीत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स आदी विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.