बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली आहे. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला. आक्रमक कर्मचाऱ्यांनी थेट अजित पवार यांच्या गाडी समोर उडी घेतली
या लाठीमारा दरम्यान महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार
दुसरीकडे अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार आज बीडमध्ये घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाती बैठक संपल्यानंतर अजित पवारांचा ताफा बाहेर पडत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफा अडवला. सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी हजारो कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळा झाले होते. त्यात महिला कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांना भेटू देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी भेट दिली गेली नाही. बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि राजेश टोपे यांचा ताफा निघाला असता तो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अडवला. तेव्हाही या कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाड्या पुढे निघाल्या. त्यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.