ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन:पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन संवाद साधणार

शिवसेनेचा शनिवारी 55वा वर्धापनदिन आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे वर्धापनदिनाचा कार्यक्रम परंपरेप्रमाणे करता आला नाही. यंदाही दुसरी लाट धडकली. ती शांत होत असली तरी पुन्हा उसळू नये म्हणून गर्दी टाळण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. कोरोनाने श्वास घेणे कठीण केले असले तरी श्वासाश्वासात शिवसेना आहे. सोहळा होणार नसला तरी कोरोनाशी दोन हात करण्यात यशस्वी ठरलेले शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षीप्रमाणेच वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई करणार आहेत.

शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात होतो. वर्धापनदिन म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून चैतन्यमयी मार्गदर्शन मिळण्याची एक पर्वणीच असते. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा उपचार महत्त्वाचा आहे. त्यामुळे गर्दी न करता साधेपणाने आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आदी सामाजिक उपक्रम राबवून यंदाचा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली.

असा साजरा होईल वर्धापनदिन

शिवसेनेची प्रत्येक शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयात निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता भगवा ध्वज फडकवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. सद्यस्थितीला अनुसरून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात यावेत. कोरोना तसेच आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात यावी. या कार्यक्रमांच्या वेळी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *