प्रथम वर्ष पदवीच्या सर्वच अभ्यासक्रमांसाठी प्रवेश (सीईटी)परीक्षा
पुणे – बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी जुलैअखेर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणारच आहे. त्यासाठी आता अभ्यासाची तयारी करणे विद्यार्थ्यांना क्रमप्राप्त ठरणार आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत दरवर्षी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, आर्किटेक्चर, एमसीए, एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते. बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक वर्षी मेमध्ये ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.
यंदा करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. करोनाची ही स्थिती पाहता सीईटी आयोजित करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ही परीक्षा अद्याप होऊ शकली नाही.
सीईटीच्या तारखा जाहीर करण्याची मागणी राज्यभरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. त्यात जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. त्यावरून करोनामुळे बारावी परीक्षा होऊ शकली नाही, तरी सीईटी होणार आहे, हे निश्चित आहे.
सीईटीसाठी यापूर्वीच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यात बहुतांशपणे अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर सीईटी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे आता सीईटीसाठी अभ्यास करण्याची मानसिकता विद्यार्थ्यांना निर्माण करावी लागणार आहे.
कला, विज्ञान, वाणिज्यसाठी सीईटी
यंदा पहिल्यांदाच महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे नियोजन उच्च शिक्षण विभागाकडून सुरू आहे. ही सीईटी होणार असल्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच सीईटीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पुन्हा अभ्यासाची उजळणी विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. त्याचे स्वरूप अद्याप निश्चित नसले, तरी ही परीक्षा बारावी अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यामुळे अभ्यासाची आतापासून तयारी सुरू करणे आवश्यक बनले आहे.