राज्य सरकारचा नागरिकांना मोठा दिलासा:जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज नाही
येत्या सोमवारपासून राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठणार असून त्यासाठी राज्य सरकारनं जिल्हानिहाय गट तयार केले आहेत. त्यानुसार, पहिल्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार असून रेड झोन वगळता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार नाही.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणेच जिल्हांतर्गत प्रवासावरही कठोर बंधने घालण्यात आली होती. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक कारणासाठी जिल्हांतर्गत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र त्या प्रवासासाठी ई पास सक्तीचा करण्यात आला होता. त्यामुळं आपापल्या गावाकडं जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गावाकडून मुंबईला येतानाही अनेक चौकशांना सामोरं जावं लागत होतं. तांत्रिक कारणामुळं कधी-कधी वेळेवर ई पास मिळत नसल्यानं लोकांची मोठी अडचण झाली होती. ही अडचण आता दूर झाली आहे.
राज्यातील अनलॉकबाबत शनिवारी मध्यरात्री राज्य सरकारनं आदेश जारी केले आहेत. राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्यानं कसे शिथील होणार याची सविस्तर माहिती सरकारच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांचे पाच गट करण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या चार गटांत समावेश असलेल्या जिल्ह्यांत पूर्वीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. खासगी कार, टॅक्सी, बस व पॅसेंजर रेल्वेनं प्रवास करताना ई पासची गरज लागणार नाही. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार पाचव्या गटात असलेल्या ठिकाणी ई पासशिवाय प्रवास करता येणार नाही. हा प्रवासही केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करता येणार आहे. दिलासादायक बाब अशी की, सध्या पाचव्या गटात कुठल्याही जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र, चौथ्या गटातील जिल्ह्यांत रुग्ण वाढल्यास हे जिल्हे पाचव्या गटात जाऊ शकतात. तसे झाल्यास तिथं ई पास आपोआप बंधनकारक होणार आहे.