राज्यातील सोळाशे पोलीस करोनाच्या विळख्यात
मुंबई – राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलीस आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. मात्र, आता पोलिसांनादेखील करोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. राज्यभरातील तब्बल 1 हजार 671 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यत 18 जणांचा करोनाने बळी घेतला आहे.
राज्यात पोलिसांना करोनाची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 1 हजार 671 पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळले आहे. या करोनाग्रस्तांमध्ये 174 अधिकारी आणि 1 हजार 497 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक संख्या ही मुंबई पोलिसांची आहे. एकूण करोनाबाधितांपैकी 541 जणांनी त्यावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, पोलिसांवरचा ड्युटीचा ताण आणि करोनाग्रस्त पोलिसांची संख्या पाहता, त्यांना आराम मिळावा म्हणून राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबईत लष्कर आणण्याची गरज नसून, पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही स्पष्ट केले.
जे. जे. पोलीस ठाण्यातील 18 जण कर्तव्यावर हजर
जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तब्बल 45 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यापैकी 18 कर्मचारी यशस्वी उपचारानंतर कर्तव्यावर परतले आहेत. तर आणखी चार जणांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ते देखील लवकरचं कामावर रुजू होणार आहे. आता उरलेल्या 23 कर्मचाऱ्यांचीही प्रकृती उत्तम असून रुग्णालयात उपचार घेत आहेत.