ऑनलाइन वृत्तसेवापुणे

ब्राम्हण समाजासाठी’अमृत’ महामंडळ कार्यान्वित करा-प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

महाविकास आघाडीचे सरकार ब्राह्मण समाजाबाबत उदासीन – विश्वजीत देशपांडे

पुणे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार असताना अमृत महामंडळ स्थापन करण्यात आले होते. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. हा विषय मंत्रिमंडळ मान्यतेसाठी येणार, तितक्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर विश्वासघातामुळे भाजपा सरकार गेले, अन् महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.आता विद्यमान सरकारने महामंडळाचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महामंडळ कार्यान्वित करावे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.


क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने ब्राह्मण किर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्यांना एक हात मदतीचा अंतर्गत शिधा वाटप करण्यात आले.‌यावेळी आ पाटील बोलत होते.‌
या कार्यक्रमाला क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, कोथरूड मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, याज्ञवल्क आश्रमाचे मोहनराव मुंगळे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे प्रमोदराव शेजवलकर, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक / पुणे केंद्रचे विश्वनाथ भालेराव महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अतुल व्यास, परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे डॉ. अरुण हुपरीकर, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड.ईशानी जोशी, आम्ही सारे ब्राह्मणचे भालचंद्र कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे
मनोज तारे, मदनजी सिन्नरकर, मयुरेश अरगडे ( विप्र संघ ), हर्षद जोगळेकर (कीर्तनकार), सुशील नगरकर (गहुंजे ब्राह्मण संघ), सतीश कुलकर्णी (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ) यांच्या सह भाजपाच्या पल्लवीताई गाडगीळ, सुप्रियाताई माझीरे, संगीताताई आदवडे, सौमित्र देशमूख, क्रीएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर वा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


श्री. पाटील म्हणाले की, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने अमृत महामंडळ स्थापन करुन, त्याला एक हजार कोटी रुपये देऊन ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. त्यानुसार या महामंडळाची स्थापनाही झाली. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. केवळ मंत्रिमंडळ मान्यता बाकी होती. ती मान्यता मिळणार तितक्यात राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर विश्वासघातामुळे भाजपा सरकार गेले, अन् महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. पण विद्यमान सरकारने महामंडळाचा विषय मंत्रिमंडळात आणून ते कार्यान्वित करावे, यासाठी माझा सतत पाठपुरावा सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासाठी पत्रव्यवहार देखील केला आहे.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा समाजाच्या सर्वच घटकांना फटका बसला. ब्राह्मण समाजातील पौरोहित्य आणि किर्तनकारांना याची झळ बसली. या वर्गाला ही संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून निधी उभारुन ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना एक आधार देता येईल वा या कामी संदीप खर्डेकर वा त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केल्यास त्यास सर्वतोपरी मदत करू असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ब्राह्मण पुरोहित आणि किर्तनकार यांना एक हात मदतीचा देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळत असून यातून समाजाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करता आली.ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाची अवस्था वाईट आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. चांदा ते बांदा राज्यभर प्रवास करताना मराठवाड्यासह सर्वत्र ब्राह्मण समाजाची अवस्था बघितली आणि मराठा समाजाप्रमाणे ब्राह्मण समाजालाही आधाराची गरज असल्याचे लक्षात आले असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले. या कार्यात मुकुल माधव फाउंडेशन चा मोलाचा वाटा असल्याची खर्डेकर म्हणाले.
परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे यांनी ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठीच्या लढ्याची माहिती देताना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध किर्तनकार सौ.जयश्री देशपांडे यांनी किर्तनकारांच्या व्यथा मांडल्या. त्या म्हणाल्या की, शासनाने किर्तनकारांची बाजू समजून घेऊन त्यांनाही मदत करावी अशी आग्रही मागणी आम्ही राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. पण त्यावर काहीही उपायोजना केल्या नाही. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आमच्या व्यथा शासन दरबारी मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले तर विश्वजित देशपांडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *