कोव्हिशिल्ड लसीचा तिसरा बुस्टर डोस कोरोनासह सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण देणार
लंडन : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात लसीकरण सुरू आहे. सध्या प्रत्येकाला लसीचे दोन डोस देण्यात येत आहेत. पण कोव्हिशिल्ड लसीचा तिसरा बुस्टर डोस दिल्यानंतर शरीराला कोरोनासह सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळेल असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या डोसला देखील सुरुवात होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑक्सफर्डच्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे की, कोव्हिशिल्ड लसीच्या तिसऱ्या बुस्टर डोसनंतर कोरोना संसर्गापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकतं. जगभरात सध्या कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस दिले जात आहेत. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवस ते 16 आठवड्यांपर्यंत आहे. पण लसीचा तिसरा डोस स्पाईक प्रोटीनविरूद्ध शरीरात एँटिबॉडीची संख्या वाढवत असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे.
महत्त्वाचं म्हणजे बुस्टर डोसमुळे कोरोनाच्या कोणत्याही व्हॅरिएंटसोबत लढण्यास शरीर सक्षम असेल असं देखील ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे दरवर्षी प्रत्येकाला कोरोना लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागेल असं लस निर्मिती कंपन्यांना सांगितलं आहे. कारण येत्या काही वर्षांमध्ये कोरोनाचे आणखी घातक विषाणू येणार असल्याचं सांगितलं आहे.
त्यामुळे येत्या काळात कोरोना लसीचा बुस्टर डोस फार आवश्यक आहे. फायझर कंपनीने कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची गरज असल्याचं सांगितलं आहे. कोरोना लसीतून मिळाणारी रोगप्रतिकार शक्ती काही काळानंतर कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून कोरोना लसीचा बुस्टर डोस येत्या काळात महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.