शुभवार्ता:मान्सून अंदमानात दाखल:मराठवाड्यात सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
साऱ्या देशात आनंद घेऊन येणाऱ्या मान्सूनची शुभवार्ता आली असून नैऋत्य मौसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल झाले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये मान्सूनचे वारे पूर्ण अंदमान-निकोबार व्यापतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. अंदमानात प्रवेश करताना बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि आग्नेयेकडील काही भागही मान्सूनने व्यापला. गेल्यावर्षी १७ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला होता.
नैऋत्येकडून येणारे वारे अधिक प्रभावी झाले आहेत. तसेच निकोबार बेटांचा परिसर, अंदमानचा समुद्र या भागामध्ये सर्वदूर पाऊस आहे. मान्सून येत्या काही दिवसांत अधिक प्रभावीपणे पुढे प्रवास करेल. बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, बंगालच्या उपसागराचा उर्वरित आग्नेय भाग, अंदमानचा संपूर्ण समुद्र, अंदमान-निकोबार बेटांचा संपूर्ण प्रदेश, बंगालच्या उपसागराचा मध्य भाग येथे मान्सून पुढे सरकेल. २१ ते २३ मे या दरम्यान अंदमान-निकोबार बेटांच्या बहुतांश परिसरात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात शनिवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाला सुरुवात होईल. मंगळवारी याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह विजा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.