लसीच्या पहिल्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली तर दुसरा डोस तीन महिन्यांने-केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशभरात लसीकरण सुरू आहे.
तथापि, लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्यास दुसरा डोस केव्हा घ्यावा, याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता यावर खुलासा केला आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणाच्या पहिल्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली तर बरे झाल्यानंतर दुसरा डोस तीन महिन्यांपर्यंत टाळावा.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोविड-19 (NEGVAC)साठी व्हॅक्सिन एडमिनिस्ट्रेशनवर राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समूहाकडून नव्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत. राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. नव्या शिफारशींनुसार आजारातून बरे झाल्यानंतर कोरोनाची लस तीन महिन्यांपर्यंत टाळावी.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, पहिल्या डोसनंतर संसर्ग झाल्यास कोरोनातून क्लिनिकल रिकव्हरीनंतर दुसरा डोस 3 महिन्यासाठी पुढे ढकलला जाईल. रुग्णालयात दाखल किंवा आयसीयूची आवश्यकता असलेल्या गंभीर रुग्णांनाही लसीचा डोस घेण्यापूर्वी 4 ते 8 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे, की एखादी व्यक्तीला लस घेतल्यानंतर किंवा कोरोनाने संसर्ग णल्यावर RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट आल्याच्या 14 दिवसांनी रक्तदान करू शकते. स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. लसीच्या आधी रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे लस घेणाऱ्यांच्या स्क्रीनिंगची कोणतीही आवश्यकता नाही.