३० जूनपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती:करोनामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई : राज्यभरातील करोनाचा उद्रेक तसेच जुलैमध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सोमवारी स्थगिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षांतील कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या येत्या ३० जूनपर्यंत बदल्या करू नयेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सहकारी मंत्र्यांना दिले आहेत. जूनअखेर राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन बदल्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे एप्रिल-मेदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. प्रत्येक विभागात कार्यरत पदांच्या ३० टक्के पदांच्या बदल्या करण्याचे अधिकार विभागास असतात. शिपाई किं वा कारकू नपर्यंतच्या बदल्यांचे अधिकार विभागीय आयुक्त किं वा स्थानिक पातळीवर देण्यात आले असून ब आणि अ वर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार संबंधित विभागाचे मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना असतात. बदल्यांच्या कायद्यानुसार बदल्यांची प्रक्रिया ३१ मेपूर्वी पूर्ण करावी लागते. त्यानंतरच्या बदल्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते.
सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे, करोना रोखण्याकरिता अत्यावश्यक सेवेतील पदे, गंभीर स्वरूपाच्या तक्रोरी प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक असल्याची सक्षम अधिकाऱ्याची खात्री पटल्यास बदल्या करण्यास मुभा देण्यात आली आहे. फक्त या सवलतीचा गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. कारण ही कारणे पुढे करीत मंत्री कार्यालयातून बदल्यांचे आदेश काढले जातात, असे प्रकार यापूर्वी घडले आहेत.