ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

वैद्यकीय प्रशिक्षणार्थीची सेवा उपलब्ध करून देण्यास मान्यता:100 दिवस सेवा देणाऱ्यास नियमित भरतीमध्ये प्राधान्य

नवी दिल्ली : करोनाचा मुकाबला करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळामध्ये वाढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी काही उपाययोजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नीट-पीजी किमान चार महिन्यांसाठी पुढे ढकलून करोनाचा मुकाबला करण्यासाठी पात्र डॉक्टर उपलब्ध करून देण्यास आणि वैद्यकीय प्रशिक्षणार्थीची सेवा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचे सोमवारी पंतप्रधानांच्या कार्यालयातून एका निवेदनाद्वारे जाहीर करण्यात आले.
दूरध्वनीवरून सल्ला देऊन आणि करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख ठेवून एमबीबीएसच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची सेवाही उपलब्ध करून घेता येणे शक्य असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. वैद्यकीय प्रशिक्षणार्थी त्यांच्या शाखेच्या निरीक्षणाखाली काम करतील. त्यामुळे करोनाचा मुकाबला करीत असलेल्या डॉक्टरांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होईल, असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.
त्याचप्रमाणे बीएससी किंवा जीएनएम पात्र परिचारिकांची करोनासाठी पूर्णवेळ सेवा ज्येष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखीखाली उपलब्ध करून देता येईल.

कोविड व्यवस्थापनामध्ये जे किमान १०० दिवस सेवा देतील त्यांना सरकारच्या नियमित भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल, कोविडशी संबंधित काम देण्यात येणारे वैद्यकीय विद्यार्थी आणि व्यावसायिक यांचे लसीकरण केले जाईल, असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *