दिलासा:सिरमच्या कोविशिल्ड लसीची किंमत 100 ने कमी:पुनावालांची माहिती
नवी दिल्लीः देशात १ मेपासून करोनावरील लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा सुरू होतोय. अशातच एक चांगली बातमी आली आहे. करोनावरील लस उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लसीची किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. राज्य सरकारांसाठी ही किंमत कमी करण्यात आली आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करून दिली आहे. यामुळे राज्यांचा कोट्यवधींचा निधी वाचणार आहे, असं पुनावाला म्हणाले.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लस उत्पादक कंपन्यांंना आपल्या उत्पादनातील ५० टक्के वाटा हा राज्ये आणि खुल्या बाजारात विकण्याची परावनगी दिली. यानंतर लस उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारसाठी असलेली लसीची किंमत १५० रुपये प्रति डोस कायम ठेवत राज्ये आणि खुल्या बाजारात म्हणजे खासगी हॉस्पिटल्ससाठी लसची किंमत जाहीर केली. यानुसार राज्यांना प्रति डोस ४०० रुपये आणि खासगी हॉस्पिटल्सना प्रति डोस ६०० रुपये द्यावे लागणार होते. सीरम बरोबरच लस उपत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने आपल्या कोवॅक्सिन लसची किंमतही जाहीर केली. दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारला दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा राज्ये आणि खासगी हॉस्पिटल्ससाठी अधिक दर जाहीर केल्याने वाद निर्माण झाला होता.
राज्यांसाठी लस उत्पादक कंपन्यांचे वेगळे दर का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. तसंच विरोधी पक्षांनी यावरून केंद्र सरकारच्या धोरणावर टीकाही केली. यानंतर केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला लसीच्या किंमत कमी करण्याच्या सूचना दिल्याचं काही दिवसांपूर्वी सूत्रांनी सांगितलं होतं. सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यांसाठी लसची किंमत कमी केल्याचं दिसतं. पण केंद्र सरकारला ज्या दराने लस दिली जात आहे. त्याहून नवीन किंमत दुप्पटच आहे. तर खासगी हॉस्पिटल्ससाठी किंवा खुल्या बाजारात कोविशिल्ड लसीचा दर ६०० रुपये प्रति डोस हा कायम ठेवण्यात आला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने राज्यांसाठी कोविशिल्ड लसीची किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. राज्यांना आता प्रति डोस ४०० रुपयांऐवजी ३०० रुपये दर असेल. लसीची हे नवे दर तात्काळ लागू होतील. यामुळे राज्य सरकारांचा कोट्यवधींचा निधी वाचेल. तसंच यामुळे जास्तीत जास्त लसीकरण होईल आणि अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे