आरोग्यबीडविशेष वृत्त

25 हजाराहून अधिक रुग्णांना मेडिको हेल्पलाईनच्या माध्यमातून डॉ छाजेड दाम्पत्य ठरले खरे देवदूत

साथरोगाच्या काळात करोनाग्रस्त रुग्णांना मोफत टेलिमेडिसीन सेवा देण्याचे मोलाचे काम पुण्यातील डॉ. गौतम छाजेड आणि डॉ. मनीषा छाजेड हे दाम्पत्य करत आहे. त्यांनी सुरू केलेल्या मेडिको हेल्पलाईनच्या माध्यमातून २५ हजाराहून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला दिला आहे. त्यातून वेळेवर निदान आणि औषधोपचार मिळाल्याने या रुग्णांसाठी हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने देवदूत ठरले आहे.

करोनाच्या उद्रेकापासून छाजेड दाम्पत्य अथकपणे रुग्णसेवेत कार्यरत आहे. हेल्पलाईनवर फोन करणाऱ्या रुग्णांच्या लक्षणांचे तातडीने निदान करणे, त्यांना औषधोपचार सुचविणे, घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांशी संवाद ठेवणे, त्यांच्यापर्यंत औषधे पोहोचविणे, गंभीर रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळवून देण्यासाठी धडपड करणे… अशी विविध प्रकारची सेवा ते देत आहेत.

गरजू रुग्णांची सेवा या उद्देशातून डॉ. गौतम आणि डॉ. मनीषा यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. डॉ. गौतम यांचे वडील डॉ. सुवालालजी छाजेड बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर होते. तळागाळातील रुग्णांवर ते मोफत उपचार करायचे. ते मूळचे चकलंबा ता गेवराई येथील आहेत

सामाजिक कामाचा हा वसा जपण्याचे ध्येय गौतम यांनी बाळगून बीडमधील एस. के. एच. वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. मनीषा यांनी पुण्याच्या धोंडूमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले. पुण्यात इंटर्नशीप करत असताना हे दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बिबवेवाडी आणि जेजुरीत डायलिसिस सेंटर सुरू करत गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात डायलिसिस आणि डायग्नोस्टिक सेवा देण्यास सुरुवात केली. दहा वर्षांपूर्वी एच वन एन वन स्वाईन फ्लूच्या साथीच्या काळातही रुग्णांना मोफत औषधोपचार सेवा देण्याचे काम या दाम्पत्याने केले.

करोनाच्या उद्रेकानंतर रुग्णांचे तातडीने निदान करण्यासाठी त्यांनी मेडिको हेल्पलाईनचा उपक्रम हाती घेतला. ‘सुरुवातीला करोना चाचणी अहवाल येण्यास वेळ लागायचा. त्यामुळे उपचारास विलंब व्हायचा. करोनाबाधितांना तातडीने उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे आम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्णांची लक्षणे समजून घेत त्यांना औषधोपचार देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर रुग्णांना विलगीकरणाचे महत्त्व पटवून देणे, घरातील अन्य व्यक्तींचे समुपदेशन करणे, अशी कामेही करत होतो. रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना धावपळ करावी लागत असल्याने आम्ही दहा खाटांचे केअर सेंटर सुरू केले. त्यामध्ये सवलतीच्या दरात विविध तपासण्या आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून दिले. निस्वार्थीपणे हे काम करत असल्याने विविध रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरही आमच्या उपक्रमात सहभागी झाले आहेत,’ असेही डॉ. गौतम आणि डॉ. मनीषा यांनी आवर्जून सांगितले.

……

महाराष्ट्रासह विविध राज्यातून करोनाबाधितांचे फोन

मेडिको हेल्पलाईनवर आता महाराष्ट्रातील विविध भागांसह राजस्थान, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यातील करोनाग्रस्त रुग्णही फोन करतात. त्यांनाही मोफत टेलिमेडिसीन सेवा दिली जात आहे.

…….

पुणेकरांचा नेहमीच पाठिंबा

आमच्या सामाजिक कामाला पुणेकरांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. विविध गणेश मंडळे, संस्थांनी पुरस्कार देऊन या कामाचे कौतुक केले आहे, असेही डॉ. गौतम छाजेड यांनी सांगितले.