महत्वाची बातमी:राज्यात 18 वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय
मुंबई – केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांसाठीच लसीकरणाची घोषणा केली आहे. यानंतर अनेक राज्यांनी सर्वांनाच मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घतेला आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर, सर्वप्रथम उत्तर प्रदेशने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड आदी राज्यांनीही मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता, महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 10 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. स्पुतनिक – V लशीला परवानगी दिल्यानंतर, आता लोकांना घरो-घरी जाऊन लस देण्याची योजना सुरू आहे. देशातील लोकांना मोठ्या संख्येने लस दिली जावी, यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 1 मे पासून 18 वर्षापुढील युवकांनाही कोरोनाची लस मिळणार आहे. मात्र, कोविशील्ड लसीच्या किंमतीवरुन वाद निर्माण झाला आहे. पण, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना लस मोफत देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
राज्यातील 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे 45 च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, कोविडशील्ड लसीचे दर केंद्रासाठी दीडशे रुपये, राज्याला 400 रुपये आणि खासगींना 600 रुपये असणार आहेत. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा 600 रुपये राज्यांना व 1200 रुपये खासगींना जाहीर झाली आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यास होकार दिला होता, असे नवाब मलिक यांनी जाहीर केलंय