‘बये तुला बुरगुंडा होईल गं’चे ‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचे करोनाने निधन
औरंगाबाद – प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे (वय ६२) यांचे शुक्रवारी करोनाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने राज्यभर प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ लोककलावंत निरंजन भाकरे यांचे शुक्रवारी निधन झाले.
रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथील भाकरे यांची जडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन व भारुडाचा वारसा वडीलांकडून मिळाला होता. वडीलांचे छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी कष्टाची कामे केली. नंतरच्या काळात खासगी कंपनीत कामगार होते. लोककलेचे अभ्यासक अशोक परांजपे यांच्या संपर्कात आल्यानंतर भाकरे यांना ‘सोंगी भारुड’ सादरीकरणाची संधी मिळाली. काही वर्षांतच भाकरे नावारुपाला आले. त्यांचे देश-विदेशात कार्यक्रम सादर झाले.
‘व्यसनमुक्ती पहाट’ कार्यक्रमातून चार वर्षे त्यांनी जनजागृती केली. त्यांनी ‘मराठी बाणा’, ‘लोकोत्सव’ कार्यक्रम गाजविले. टीव्ही शो, वेरूळ-अजिंठा महोत्सव, लोकगाथा अशा कार्यक्रमात भाकरे यांचे भारुड सादरीकरण गाजले होते. सोंगी भारुडासाठी भाकरे राज्यभर परिचित झाले होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार केला होता. या पायघोळाचा घेर ७५ मीटर आणि वजन साडेआठ किलो होते. पायघोळ आणि इतर अलंकारांच्या वजनासह तब्बल २० किलोग्रॅम वजनाची वेशभूषा सांभाळत भाकरे यांनी भारुड सादरीकरण केले होते. या विक्रमाची ‘वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.