अत्यावश्यक कारणांसाठी राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद:कसा मिळेल ई पास
राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.
अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे.
नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले. 1 मे पर्यंतच हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळं यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
ई- पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावं?
- ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- ज्यानंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावं.
- पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.
- आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत.
- प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.
- कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
- अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
- पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
- या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
- प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.
ई- पाससंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे
- अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
- अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची आवश्यकता नाही.
- कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
- ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी सदर प्रक्रियेसाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी. जिथं त्यांची मदत केली जाईल.