ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

लसीकरणाचा तिसरा टप्पा:1 मे पासून 18 वर्षाच्या पुढील सर्वांचे लसीकरण होणार

नवी दिल्लीःकरोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनावरील लस घेता येणार आहे. येत्या १ मेपासून नागरिकांना करोनावरील ही लस घेता येईल, एएनआयने हे वृत्त दिलं आहे. राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचे डोस विकत घेता येणार आहेत.

करोनाने देशातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी वेळेत करोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार गेल्या वर्षाभरापासून प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यानुसार लसी उत्पादक लसीचा ५० टक्के लसींचे डोस हे केंद्र सरकारला पुरवतील. आणि उर्वरीत ५० टक्के डोस हे राज्य सरकार किंवा खुल्या बाजारात विकण्यास स्वतंत्र असतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. करोनावरील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात लसीच्या किंमती, पुरवठा, पात्रता आणि लसीकरण प्रक्रिया अधिक लवचिक करण्यात आली आहे. लसीकरणात सहभागी असलेल्या पातळ्यांवरील भागिदारांबाबत लवचिक धोरण अवलंबण्यात आलं आहे.
राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादकांकडून लसीचे डोस विकत घेता येतील. तसंच १८ वर्षांवरी सर्व नागरिकांना राज्य सरकारं आता लस देऊ शकतील. तसंच केंद्र सरकारची करोनावरील आधीची मोहीमही सुरूच राहणार आहे. प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरूच राहणार आहे, अशी माहिती केंद्राने दिली आहे.

लस उत्पादकांना आता आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवावं लागणार आहे. एवढचं नव्हे तर लसीच्या उत्पादनासाठी देश आणि विदेशातील उत्पादकांची मदतही घेता येईल. रशियाची लस स्पुतनिक-व्हीचे उत्पादनही आता देशात होणार आहे. खासगी लस उत्पादकांनी आपल्या लसींच्या डोसेसची किंमत जाहीर करून पादर्शकता ठेवावी. तसंच खासगी हॉस्पिटल्सही बाजारातून लस विकत घेऊ शकणार आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलं. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजारी नागरिकांचे लसीकरण सुरू केले. आता तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.