ऑनलाइन वृत्तसेवाविदेश

लवकरच महाराष्ट्रातील दुसरी लाट संपूष्टात येईल-अमेरिकेत असणारे पण राज्याचे डाॅ.रवी गोडसे

वाॅशिंग्टन – महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट सुरु आहे. नवीन रुग्णसंख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. अशावेळी राज्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या वातावरणात नागरिकांना दिलासा कधी मिळेल या विषयावर मुळ महाराष्ट्राचे नागरिक असलेले अमेरिकन डाॅ. रवी गोडसे यांनी लाईव्हद्वारे माहिती दिली आहे.

डाॅ. रवी गोडसे म्हणाले, नागरिकांनी सकारात्मक राहायला हवे. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही जर करोनाची बाधा झाली तर घाबरण्याचे काही कारण नाही. कारण होणारा त्रास हा इतर व्यक्तिंपेक्षा नक्कीच कमी होतो. त्यामुळे केंद्र सरकारने जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यायला हवा.

महाराष्ट्रात जास्त रुग्णसंख्या वाढते आहे त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवावी. सर्वांचं लसीकरण करणे आणि जे करोना रुग्ण आहेत त्यांना सर्व पणाला लावून वाचवणे या दोन गोष्टींवर भर दिल्यास नक्कीच लवकरच महाराष्ट्रातील दुसरी लाट संपूष्टात येईल, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी करोनाची भिती न बाळगता उपचार सुरु ठेवले पाहिजे. भितीमुळे मन कमजोर होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. करोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना करोना झाला तरी मृत्यू होत नाही. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगबरोबरच जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, असेही डाॅ. गोडसे म्हणाले.