ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्य सरकारच्या कडक लॉकडाऊनच्या हालचाली:मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात करोनाचा उद्रेक झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू करतानाच निर्बंध आणखी कठोर केले आहेत. मात्र, त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होत असल्याने व वाहनांचीही मोठी वर्दळ कायम असल्याने आता कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. तशी मुख्यमंत्र्यांचीही भूमिका आहे, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आज राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत ही पावले उचलली जातील. त्यात लोकल रेल्वे प्रवासावर निर्बंध आणले जाऊ शकतात तसेच सर्वसामान्यांसाठी पेट्रोल-डिझेल विक्रीही बंद केली जाऊ शकते असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले

राज्यातील करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि कठोर निर्बंध लावले आहेत. राज्यात १ मे पर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. मात्र राज्य सरकारने हे निर्बंध लावताना ज्या काही सवलती दिल्या आहेत त्याचा गैरफायदा उठवला जात असल्याचे लक्षात येत आहे. आज संचारबंदीचा पहिला दिवस होता. मात्र, निर्बंध असतानाही सार्वजिनिक ठिकाणी गर्दी कमी होवू शकली नाही. ही बाब गांभीर्याने घेत राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांना माहिती दिली.


मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा प्रमुख शहरांत तसेच अन्य ठिकाणी आजही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसली. किराणा दुकाने, भाजी मार्केट येथे गर्दी कायम आहे. लोकलमधील गर्दीही कमी झालेली नाही. त्यामुळेच लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार आम्ही करत आहोत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. यासाठी येत्या दोन दिवसांत कठोर पावले टाकली जातील. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करता येईल. इतर कुणी प्रवास करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. पेट्रोल पंप सुरू राहतील पण अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन उपलब्ध असेल. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. भाजीपाला आणि किराणा सामानासाठी जी गर्दी होत आहे ती कमी करण्यासाठीही निर्बंध घातले जावू शकतात, असे वडेट्ट्वार यांनी नमूद केले. निर्बंध कठोरपणे लागू करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत व त्यांना तसे अधिकारही दिलेले आहेत, असे ते म्हणाले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी त्यांचीही भूमिका आहे. तेव्हा उद्यापासून अजिबात घराबाहेर पडू नका. आज संचारबंदीचा पहिला दिवस असल्याने थोडी सवलत दिली मात्र, उद्यापासून स्थिती पाहून जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद केली जातील, असा स्पष्ट इशारा वडेट्टीवार यांनी दिला. सरकार वारंवार सर्वांना सावध करत आहे. त्यामुळे यापुढे कारवाई केल्यास कुणी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असेही वडेट्टीवार म्हणाले. गर्दी कमी झाली नाही तर मुख्यमंत्रीच एकदोन दिवसात कठोर पावले उचलतील आणि कडक लॉकडाऊनचे आदेश देतील, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.