ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

मोठी बातमी! लाॅकडाऊनच्या हालचालींना वेग:बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – राज्यात नवीन करोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने राज्य संपूर्ण लाॅकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. सर्वपक्षीय बैठक, टास्क फोर्सची बैठक आणि त्यानंतर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली.

राज्यात लाॅकडाऊन लागू करण्याआधी जनतेला पूर्व सूचना देण्यात येईल. लाॅकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी, लाॅकडाऊनची तयारी सुरु आहे. जनतेला कशी मदत करण्यात येईल याचा विचार करण्यात येत आहे. बैठकीत लाॅकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यात यावे यासाठी सर्वस्तरातून मागणी होत आहे. कोरोनाबाधितांचं आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे. काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा करतील. ज्यांचं हातावर पोट आहे त्याच्यांसाठी काहीतरी करावं लागेल. लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं न केल्यास संसर्ग वाढत जाईल, असं राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.

14 ते 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनची शक्यता –

राज्यातील वाढती करोनारुग्णसंख्या पाहता राज्य सरकार 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. रुग्णसंख्या कमी होत नसल्यास लाॅकडाऊन वाढण्याचीही शक्यता आहे. या लाॅकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. तसेच वेळीच लाॅकडाऊन न केल्यास एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्णांचा आकडा 11 लाख्यांच्या आसपास जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.